असा मी असामी
माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. पहिली-दुसरीचा वर्ग मी त्यांच्या हाताखालीच शिकलो. त्यांना वाचनाची आवड होती. ग्रामपंचायतीच्या वाचनालयात बसून वर्तमानपत्रातील शब्द आणि शब्द ते वाचून काढीत असत. त्यांचे बोट पकडून मीही असाच कधीतरी वाचनालयातल्या बाकावर जाऊन बसलो. तिथेच मला किशोर, चांदोबातल्या बोलक्या चित्रांनी भुरळ घातली. तेव्हापासून विक्रम आणि वेताळ या कथामालेतील मानगुटीवर बसलेला वेताळ अजून उतरायला तयार नाही.
वाचनानेच मला कधीतरी लेखनाची सर्जनशील वाट खुली करून दिली. नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्या सुट्ट्यांमध्ये कितीतरी पुस्तकांचा फडशा पाडला. गुप्तहेर कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असणारे लेखक बाबा कदम यांची 'भालू' कादंबरी वाचनात आली. ती मला विलक्षण आवडली. नंतर झपाटल्यासारख्या त्यांच्या कितीतरी कादंबऱ्या वाचून काढल्या. आणि एका अनाम क्षणी काहीतरी लिहून गेलो. ती कविता असल्याचा नंतर साक्षात्कार झाला. कवितेने झपाटून टाकलं. तिनेच आईची ममता दिली. तिच्या निरपेक्ष वात्सल्यात नखशिखांत न्हाऊन निघालो. बहिणीच्या, पत्नीच्या रूपात ती भेटली. मैत्रीचं अलवारपण आणि मुलींची निरागसता हृदयात काठोकाठ भरता आली.
कवितेने मन भरतं, पोट भरत नाही. असं रखरखीत वास्तव सांगणाऱ्या शब्दालयच्या सर्वेसर्वा असणाऱ्या सुमती लांडे यांनी मला काल्पनिक जगातून वास्तवाच्या जगात आणलं. शिक्षण पूर्ण झालं होतं. नोकरीचा शोध सुरू झाला. नोकरीही मिळाली. सुमतीताईंनी पुढे 'आठवणींच्या कविता' हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला. त्या पहिल्या वहिल्या पुस्तकाच्या प्रती ताईंनी हातावर ठेवल्या तेव्हा सद्गदित झालो. त्यांनी पाठीवर ठेवलेल्या त्यांच्या उबदार बोटांचा स्पर्श मला आजही तेवढाच आश्वासक वाटतो.
"पाऊस जीवाचे गाणे बनतो तेव्हा
मन रुजवायाला शब्द एकही नुरतो
मग अकल्पितासम संचित पानांवरचे
पागोळ होऊनी शब्द नवा अंकुरतो"
शब्दांच्या संचिताचा हा प्रवास वडिलांचं बोट धरून वाचनालयात गेलो तेव्हा सुरू झाला. रासायनिक अभिक्रियेतल्या उत्प्रेरकासारखे बाबा कदम अकस्मात भेटले. त्यांनी अडलेल्या झऱ्याला वाट करून दिली. सुरुवातीला लिहिलेल्या अर्ध्याकच्च्या ओळींना दादासाहेब कोते या जिवलग मित्राने त्या कविता असल्याची जाणीव करून दिली. सुमतीताईंनी आठवणींच्या कवितांचा गुच्छच हातात ठेवला. कवितेचा प्रवास त्यामुळेच ललितरम्य झाला.
नोकरीच्या सुरुवातीच्या काळात दुष्काळी, डोंगराळ भागात राहिलो. तिथल्या दैन्याचा, दुःखाचा, हालअपेष्टांचा, दारिद्र्याचा ओरखडा मनावर एखाद्या मुद्रेसारखा उमटत राहिला. त्याच अनुभवांचं मुद्रांकन मन:पटलावर होत गेलं. त्या दरम्यान लिहिलेल्या कविता संकलित करून सुप्रसिद्ध चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी त्याला पुस्तकरूप दिलं. 'शरणागताचे स्तोत्र' या नावाने तो कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. शेतकऱ्याच्या कळवळ्याची आशयगर्भ कविता, अंभोरेंच्या रेखाटनातून साकारलेलं देखणं मुखपृष्ठ आणि निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी मलपृष्ठासाठी लिहिलेले हिरवे शब्द यामुळे त्या संग्रहाची साहित्य जगतात खूप चांगली चर्चा झाली. पुस्तकाला ओळीने राज्यस्तरावरील बारा साहित्य पुरस्कार मिळाले. त्यातीलच 'माणूसपण गारठलंय' ही कविता इयत्ता सातवीच्या बालभारती मराठीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून कविवर्य विठ्ठल वाघ यांनी माझ्या रूपाने नगर जिल्ह्याचाच गौरव केला.
माणूस आणि त्याचं माणूसपण हा माझ्या आस्थेचा विषय राहिलेला आहे. त्याला केंद्रस्थानी ठेवूनच मी आजवर लिहीत आलोय. अनेक कवीसंमेलनात गेलो. तिथे कविता वाचली. पडणाऱ्या यंत्रवत टाळ्यांनी कधीच विचलित झालो नाही. माझ्या व्यक्तिमत्त्वाचं झाड सदोदित बहरत ठेवणाऱ्या सर्जनाच्या मुळांना कवितेने घट्ट धरून ठेवलेलं आहे. आजवर कवितेशी प्रामाणिक राहिलो. भविष्यातही राहणार आहे. तिच्यामुळे मिळालेली प्रसिद्धी, कीर्ती, मानसन्मान पेलताना थोडासा अवघडून गेलो. कळवळा असणाऱ्या सहृदांशी तिने जन्मांतरीचं नातं निर्माण केलं. वाहत्या नदीच्या पाण्यासारखी कविता माझी जीवनदायीनी आहे.
शशिकांत शिंदे
9860909179
Comments
Post a Comment