ताटातुटीचे वर्तमान

ताटातुटीचे वर्तमान: शिकवण एकतेची!

     ज्येष्ठ साहित्यिक,‌ ज्ञानार्जनाचा पेशा आवडीने,‌प्रामाणिकपणे करणारे शशिकांत शिंदे यांचा नावलौकिक आहे. विशेष म्हणजे त्यांची 'माणूसपण गारठलंय' ही कविता बालभारतीच्या इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमात होती. यावरून कवी शिंदे यांची कवितेवरील,‌ शब्दांवरील हुकमत आणि सामर्थ्य लक्षात येते. लेखक या नात्याने शशिकांत शिंदे यांच्या नावे पाच पुस्तके जमा आहेत. त्यांचा 'ताटातुटीचे वर्तमान' हा विविध विषयांवरील काव्य असलेला संग्रह वाचण्याचा योग आला.‌ अक्षर मानव प्रकाशन,‌ पुणे यांनी अत्यंत दर्जेदार स्वरूपात हा संग्रह प्रकाशित केला आहे.‌ संग्रहाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आणि आशय स्पष्ट करणारे आहे. या कवितासंग्रहात शंभरपेक्षाही अधिक आशयघन कवितांचा समावेश केला आहे.‌बहुतांश‌ कविता ह्या सामाजिक जाणिवांवर आधारित आहेत. कळतनकळत बिघडत चाललेल्या सामाजिक घडामोडींवर परखड भाष्य करताना कवी शिंदे यांची लेखणी डगमगत नाही.‌ म्हणूनच कवी शशिकांत शिंदे 'कवितेसाठी' या काव्यात उद्विग्न होऊन लिहितात...
दहशतवादाच्या विरोधात ज्यांनी शस्त्र उपसले 
आणि जे शहीद झाले
त्यांच्या पोरक्या झालेल्या लेकरांच्या डोळ्यातील 
अश्रू पुसण्याचे सामर्थ्य 
तुमच्या कवितेत नसेल 
तर बंद करा कविता लिहिण्याचा हा नसता उद्योग 
आणि सुरू करा बाजारात तेजीत असणारा 
प्रसिध्दीचा एखादा घाऊक धंदा

    लेखक समोर येत नाहीत,‌ आवाज उठवत नाहीत अशी जी चर्चा सुरू असते त्या सत्याला एक कवीच प्रकाशात आणताना लेखकांची कानउघाडणी करतात. कवी इथेच थांबत नाहीत तर आजकाल कवी आणि कवितांची संख्या फार झाली आहे अशीही चर्चा ऐकू येते. ही परिस्थिती का निर्माण झाली यावर कवी प्रखर प्रकाश टाकताना कवींनाच खडे बोल सुनावतात. 'अक्षरांचे लक्ष थवे' या कवितेत म्हणतात...
कण्हून कुंथून केल्या तर खरडता येतील 
फार फार तर चारदोन ओळी 
कविता लिहायची असेल तर करावी लागते 
अवघ्या आयुष्याचीच होळी 
      
आजच्या वर्तमानात रस्ते जसे चकाचक,‌ मजबूत होत आहेत तसेच अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.‌ घराबाहेर पडलेली व्यक्ती सुखरूप घरी परत येईल किंवा नाही याची शाश्वती देता येत नाही. वाहनांचा वेग पाहूनच धडकी भरते अशी परिस्थिती असताना एखाद्या जीवाला‌ वाहनाने चिरडले तर पाहणारांच्या अंगावर भीतीचा काटा उभा राहतो. कवी शिंदे या परिस्थितीने व्याकूळ होतात. त्यांची लेखणी काळजाला चरे पाडणारी 'निर्विघ्न ओलांडून जाताना' ही कविता दुःखाची किनार घेऊन प्रसवते...
परवा समोरून येणाऱ्या ट्रकखाली 
दिवसाउजेडी दोन जीव चिरडलेले पाहिले 
आणि काळजात धस्स झाले !
     आजच्या युगात पूर्वीचे अनेक खेळ नष्ट‌ झाले आहेत. भातुकली हा खेळ मुली पूर्वी मोठ्या उत्साहाने खेळत. त्यातून कळतनकळत एक प्रकारची भावी आयुष्याची झुळूक पाहायला मिळे. स्त्री जीवनातील एक प्रखर सत्य कवी 'पुन्हा पुन्हा तोच खेळ' या कवितेत मोठ्या मार्मिकतेने मांडतात...
भातुकली असो वा खरेखुरे आयुष्य 
स्त्रीच्या नशिबी लिहिलेले असते फक्त वाट पाहणे 
समजून न घेता आयुष्याला 
कितीही नकोसा झाला तरी 
स्त्रिया खेळत राहतात पुन्हा पुन्हा तोच खेळ

       आपला देश,‌आपली संस्कृती ही समानतेची,‌ बंधूभावाची,‌ एकतेची शिकवण देणारी आहे असं आपण म्हणतो.‌परंतु,‌खरेच वास्तव असे आहे का? सत्य काय आहे? धर्माच्या नावाखाली काय चालले आहे हे 'रूप धर्म अधर्माचे' या कवितेत कवी निर्भयपणे व्यक्त होतात...
वादग्रस्त जमिनीचे 
जेव्हा सापडेल मूळ 
हिंदू बांधील मशीद 
आणि मुस्लिम देऊळ

    जी गोष्ट अपघाताची तीच कहानी मुलीला शाळेतून येण्यासाठी थोडासा उशीर झाला तरी मातेची तगमग, तळमळ न‌ पाहवणारी! कारण कितीही कायदे झाले,‌ शिक्षा झाल्या तरी 'निर्भया'ची संख्या वाढतच आहे. म्हणून चिंताक्रांत झालेल्या आईची अवस्था 'शरणागताचे स्तोत्र' यात शिंदे यांनी अगतिकतेने समोर आणली आहे...
सकाळी शाळेत गेलेली मुलगी 
संध्याकाळ झाली तरी परतलेली नाही 
मित्र-मैत्रिणी आणि नातेवाइकांत केली चौकशी; 
तिचा कुठेच पत्ता नाही 
पाठीवरच्या असह्म ओझ्याखाली दबल्याने 
अलीकडे तिचा गुदमरत असे श्वास; आणि घाबरत असे जीव 
ते ओझे फेकून मोकळा श्वास घेण्याचे स्वप्न तर ती पाहत नसेल ?

    कवी शशिकांत शिंदे यांनी 'पाठीवरच्या ओझ्याखाली' हे शब्द किती चपखलपणे वापरले आहेत. ती भयावह स्थिती केवळ एका विद्यार्थिनीची नाही तर बिघडलेल्या सामाजिक वातावरणाचे द्योतक आहे.
      मुलगी जन्मते. एखाद्या वेलीप्रमाणे फुलत,‌बहरत जाते.‌ तितक्यात ती वेळ येते. 'लेक परक्याचे धन' हे वास्तव सत्यात आणणारी. मुलगी सासरला गेल्यानंतर तिच्या माहेरी झालेली अवस्था कवी 'पोर सासरला जाते' या कवितेत हृदयस्पर्शी भावनेतून व्यक्त करतात.‌ माहेरी असताना‌ मुलगी केवळ घरातील माणसांशी एकरुप असते असे नाही तर घरातील,‌अंगणातील,‌ परिसरातील अनेक गोष्टींशी‌ ती एकजीव झालेली असते. म्हणून कवी म्हणतात...
पोर सासरला जाते 
फूल फुलता फुलेना 
पिंजऱ्यात पोपटाचा 
झुला झुलता झुलेना

      मानवाने निसर्ग चक्र या ना त्या कारणाने उद्ध्वस्त केले आहे. त्यांचा मोठा परिणाम पावसावर झाला आहे.‌ कधी पाऊस इतका बेभान होऊन कोसळतो की,‌ क्षणभरात होत्याचे न‌ होते करून टाकतो.
'पाण्याचा धाक' या कवितेत पावसाच्या रौद्ररूप कवी लिहितात...
गाळाने भरल्यावरती
धरणाचा सुटला धीर
वेशीला टाळून आले
गावात नदीचे नीर

     निसर्गाचा कोप कसा असतो हे आपण वरील ओळींमध्ये अनुभवली आहे.‌ परंतु,‌ पावसाचे दुसरे भीषण असे रूप कवी‌ 'दुष्काळ' या काव्यात समोर ठेवतात...
कोरड्या विहिरी 
भकास बारव 
पक्ष्यांचा आरव 
ऐकवेना

     कवी म्हटलं की तो सर्वत्र वावरत असतो. म्हणूनच 'जे न देखे रवी, ते देखे कवी' असं म्हटलं‌ जातं. कवीचं‌ वय कोणतेही असो, त्याच्या भावना टवटवीत,‌ रसरशीत अशाच असतात. त्या नैसर्गिकही असतात. कवी शशिकांत शिंदे यांनी या संग्रहात काही तारुण्यसुलभ कविता सादर केल्या आहेत.‌‌परंतु शब्दांना कुठेही वासना,‌बटबटीतपणा नाही तर एकप्रकारची पवित्रता आणि प्रासादिकता आहे.‌ ललनेचे नयन यावर अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखण्या चालविल्या आहेत.‌ अनेक गीते,‌‌ कविता प्रसिद्धीच्या झोतातही आहेत. कवी शिंदे यांची 'लेणी' ही काव्यरचना वाचकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. 
डोळे रेखीव तेजस्वी 
दोन समुद्र दो बाजू 
किती लवचिक बांधा 
जसा सोन्याचा तराजू

      आजची तरुणी सुशिक्षित आहे.‌नोकरी,‌व्यवसायाच्या माध्यमातून संसाराला आर्थिक हातभारही लावते आहे. प्रसंगी शिक्षणासाठी,‌ नोकरीसाठी घरापासून दूर राहत असते. साहजिकच मुलींमध्ये प्रचंड आत्मविश्वास जागा झाला आहे. ती स्वतःला सबला समजू लागली आहे. कवी शशिकांत शिंदे 'पापाचे भूत' या कवितेत अशा धिटावलेल्या तरुणींना सावधानतेचा इशारा देतात...
तुला असे एकटेदुकटे फिरताना 
काहीच कसे वाटत नाही ?
काट्यांचे तर सोडूनच दे 
माझा या फुलांवरही विश्वास नाही

     इथेही कवी शिंदे यांनी शब्दांची चपखल अशी‌ गुंफण केली आहे. त्यांच्या काव्यातील 'काटे आणि फुल' ही दोन‌ प्रतीके माझ्या मते गुंड आणि जवळची माणसे यासाठी वापरली आहेत. जे गुंड अर्थात काटे आहेत ती माणसं राजरोसपणे आपले इप्सित साध्य करतात परंतु कुटुंबातील,‌ परिसरातील, नात्यातील आणि परिचयातील माणसंही नकळत डाव‌ साधतात असं कवी सुचवतात. तेव्हा वाटते एक शब्द दोन‌ अर्थाने वापरण्याची जी कला नटश्रेष्ठ दादा कोंडके यांना‌ साधली होती तोच वारसा शशिकांत शिंदे पुढे चालवत असावेत.  
      'ताटातुटीचे वर्तमान' हा काव्यसंग्रह वाचनीय आहे, उद्बोधक आहे,‌ परखड भाष्य करणारा आहे. कवी शशिकांत शिंदे यांच्या आगामी लेखनाला भरपूर शुभेच्छा!
    -----
ताटातुटीचे वर्तमान : काव्यसंग्रह 
कवी : शशिकांत शिंदे 
         (९८६०९०९१७९)
प्रकाशक : अक्षर मानव प्रकाशन, पुणे 
पृष्ठ संख्या : १२७
मूल्य : ₹ १२०/-
आस्वाद : नागेश शेवाळकर 
               (९४२३१३९०७१)

Comments

Popular posts from this blog

असा मी असामी